
पौगंडावस्थेतील मुले मद्यपान का करतात?
गुणात्मक संशोधनावरुन असे दिसून आले आहे की अल्पवयात मद्यपान करण्यास अनेक कारणे असतात आणि सामाजिक दृष्ट्या मद्य अनेक भूमिका पार पाडत असते, प्रतीकात्मक पासून व्यावहारीक; हे केवळ मोठे होण्याचे लक्षण किंवा मोठ्यांचे अनुकरण करणे नसते.
मुले मद्यपान कशामुळे करु शकतात हे पालकांनी समजून घेणे गरजेचे आहे जेणे करुन ते त्यांच्या मुलांना योग्य निवड करण्यास प्रवृत्त करु शकतात.
मुलांचा मद्यपान करण्याचा पहिला अनुभव जरी चांगला नसला तरीही ती याकडे खेचली जाऊ शकतात. कदाचित त्यांना चव आवडली नसेल किंवा त्यांना त्यानंतर चांगलेही वाटले नसेल तरी देखील ते पुन्हा मद्यपान करतात. अल्पवयात मद्यपान करण्याचे धोके त्यांना समजणे गरजेचे आहे परंतु जोपर्यंत तुम्ही मद्याचा योग्य पैलू व लोक मद्य का घेतात हे त्यांना सांगत नाही तोपर्यंत ते तुमचे ऐकणार नाहीत व तुमच्यावर विश्वासही ठेवणार नाही.
धोका पत्करणे -संशोधनाने हे दाखवून दिलं आहे की विसाव्या वर्षी मेंदूचा चांगला विकास होतो, या वयामध्ये मुले नवीन संपर्क जोडतात व पुढे जाऊन त्यामध्ये आणखी सुधारणा करतात. वैज्ञानिकांचा विश्वास आहे की या विकासाच्या दिर्घ अवधीमध्ये मुलांच्या वर्तणुकीत असे बदल घडतात ज्यामुळे आपण त्यास पौगंडावस्था म्हणू शकतो – जसे नवीन व धोकादायक असलेल्या गोष्टींकडे त्यांचा कल असणे, काही किशोरवयीन मुलांना चित्तथरारक गोष्ट म्हणून मद्यपान करण्यात रुची असते. विकासात्मक बदलांमुळे शारीरिक बदल घडून येतात ज्यामुळे किशोरवयीन मुलांचे वागणे आवेगपूर्ण असते, काही वेळा मद्यपान करण्यासारख्या त्यांच्या कृतीमुळे –काही परिणाम होतात हे सुद्धा त्यांना कळत नाही.
अपेक्षावस्था —मद्य व त्याचे परिणाम याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन काय आहे याचा त्यांच्या वर्तणूकीवर परिणाम होत असतो, ज्यामध्ये ते मद्यपान केव्हापासून सुरु करतात व किती घेतात हे सुद्धा समाविष्ट असते. पौगंडावस्थेतील ज्या मुलास मद्यपान हा आनंददायी अनुभव असतो अशी अपेक्षा असते त्याची आनंद न मिळणाऱ्या मुलापेक्षा मद्यपान करण्याची शक्यता जास्त असते. मद्याबाबतच्या संशोधनाचे लक्ष आता बालपण, पौगंडावस्था ते तरुणपण यांच्यातील अपेक्षावस्थेचा मद्यपान करण्याच्या सवयींशी कसा संबंध असतो याकडे लागलेले आहे. मद्याबाबतच्या कल्पना अगदी लहानपणीच माहिती झालेल्या असतात, अगदी मूल प्राथमिक शाळेत जाण्यापूर्वी.
संवेदनशिलता व सहिष्णुता —प्रौढ व्यक्तिचा मेंदू व पौगंडावस्थेतील मुलाचा मेंदू यातील फरक लक्षात घेतल्यास आपल्याला समजेल की सुस्ती येणे, समन्वयाचा अभाव, अंतर्मुख होणे/धुंदी येणे (नशेत असल्यासारखे वाटणे) अशा नकारात्मक परिणामांचा विचार न करता अनेक तरुण मुले प्रौढ व्यक्तिपेक्षा जास्त मद्य घेऊ शकतात. या असामान्य सहिष्णुतेमुळे तरुण मुलांमध्ये अति मद्यपान (binge drinking) करण्याचा दर का जास्त असतो ते आपल्या लक्षात येईल.याचबरोबर मद्यपानाच्या सकारात्मक परिणामांबाबत तरुण मुले अधिक संवेदनशिल असतात जसे सामाजिक परिस्थितीमध्ये सोयिस्कर वाटणे, आणि या सकारात्मक सामाजिक अनुभवांमुळे तरुण मुले प्रौढ व्यक्तिंपेक्षा जास्त मद्यपान करण्याची शक्यता असते.
व्यक्तिमत्व लक्षणे आणि सह-विकृती —फार कमी वयात मद्यपानाची सुरुवात करणाऱ्या मुलांची व्यक्तिमत्व लक्षणे सारखी असतात जी त्यांना मद्पान करण्यास प्रवृत्त करतात. जी मुले अशांत, अतिसक्रिय व आक्रमक असतात- त्यांच्याबद्दल अनेकदा वर्तणूकीच्या समस्या किंवा समाजविघातक असल्याच्या तक्रारी असतात-त्याचप्रमाणे जे खिन्न असतात, अंतर्मुख किंवा अस्वस्थ असतात त्यांना मद्यपानाचा धोका अधिक असतो. मद्यपान करण्याशी संबंधित इतर समस्यांचा विचार केल्यास त्यामध्ये बंडखोरपणा, इजा किंवा धोकादायक परिस्थिती टाळण्यातील समस्या, आणि इतर अनेक प्रकारच्या विलक्षण सवयी समाविष्ट असतात ज्यामुळे ही मुले नियमांचा किंवा इतरांच्या भावनांचा विचार न करता वागत असतात.
(वैद्यकशास्त्रामध्ये, सह-विकृती म्हणजे एखाद्या मूळ विकृती किंवा आजारामुळे अतिरिक्त विकृती (किंवा आजार) होणे; किंवा अतिरिक्त विकृती किंवा आजाराचे परिणाम होणे. अतिरिक्त विकृती ही वर्तणूकीविषयी किंवा मानसिक असू शकते.
अनुवांशिक घटक —मद्यपानाचा धोका वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या काही वर्तणूकविषयक किंवा शरीरक्रियाविषयक घटकांमध्ये असतात, मद्यपानाच्या प्रभावाबाबत सहिष्णुता, ज्याचा संबंध थेट अनुवंशिकतेशी असू शकतो. उदाहरणार्थ, मद्यासक्त पालकांचे मूल किंवा कुटुंबामध्ये मद्यपान करणारे अनेक लोक असल्यास त्या मुलास मद्यपानाचा धोका अधिक असतो. मद्यपान करणारे लोक नसलेल्या कुटुंबातील मुलापेक्षा मद्यासक्त पालकांचे मूल (COAs) मद्यपानाच्या 4 ते 10 पटीने अधिक धोकादायक स्थितीत असते. मद्यासक्त पालकांचे मूल लहान वयात मद्यपानास सुरुवात करण्याची व मद्यपानाच्या समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता जास्त असते.